Ad will apear here
Next
न घडलेल्या फोटोसेशनची आठवण


ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर यांचा सहा जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने...
....
एके दिवशी सकाळी सकाळी मला रामभाऊ कोल्हटकरांचा फोन आला. म्हणाले ‘अरे, तुला तेंडुलकरांनी भेटायला बोलावलंय.’ पहिल्यांदा मला वाटले, की एक तर रामभाऊ कदाचित दुसऱ्या कोणाला द्यायचा निरोप मला देत आहेत किंवा दुसरे म्हणजे ते माझी ‘खेचत’ आहेत; पण त्यांचा स्वभाव माहिती असल्याने, त्यांचे अशा सर्व दिग्गजांशी असलेले संबंध माहिती असल्याने त्यांच्याकडून असे घडणे शक्य नव्हते. माझा विश्वास बसला नाहीये हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला परत एकदा खात्री दिली व उद्याच जा असेही सांगितले. तेंडुलकर आजारी आहेत व ते डेक्कन जिमखान्यावरच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत हे सांगून बाकी कोणतेही तपशील न सांगता त्यांनी फोन बंद केला.

मी विचार करत बसलो, की त्यांनी मला कशाला बोलावले असेल? माझा ना नाट्यसृष्टीशी संबंध, ना साहित्यसृष्टीशी घरोबा, ना त्यांच्याशी माझी वैयक्तिक ओळख. नाही म्हणायला अनेक वर्षांपूर्वी फोटोग्राफीच्या एका स्पर्धेत त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळाल्याचे आठवत होते; पण ती ओळख? हे म्हणजे सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी अनेक मॉब सीन्सपैकी एका सीनमध्ये असलेल्या ‘एका’ व्यक्तीला अनेक वर्षांनंतर अमिताभ बच्चनने ओळखण्यासारखे होते. विचार काही थांबत नव्हते आणि उत्तर काही सापडत नव्हते. जाऊ दे... उद्याचे उद्या... म्हणून मी विचार सोडून दिला; पण जाण्याचे नक्की ठरवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी ‘प्रयाग हॉस्पिटल’मध्ये पोहोचलो. रिसेप्शनवर चौकशी केली. त्यांना तेथे भेटायला येणाऱ्यांची संख्या बरीच असणार. कारण... लगेचच रिसेप्शनिस्टने मला त्यांना ठेवलेल्या रूमचा नंबर व कसे जायचे ते सांगितले. रूमपाशी पोहोचलो. दरवाजा किलकिला होता. छातीत धडधड. मी हळूच दारावर टकटक केली. आतून कोणी तरी उठल्याचा आवाज झाला. त्यांनी दरवाजा उघडला. समोर होते तेंडुलकरांचे बंधू व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर. त्यांचा माझा परिचय होता. त्यांच्या विशिष्ट अशा खोलवरच्या आवाजात ते म्हणाले ‘या’ आणि वळले. मी दारातून आत पाऊल टाकले आणि माझे लक्ष समोरच्या भिंतीवर गेले. समोरच माझे ‘स्वराधिराज’ हे भीमसेन जोशी यांच्यावर नुकतेच प्रकाशित झालेले नव्या वर्षाचे थीम कॅलेंडर लावलेले होते. हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होताच; पण त्याबरोबरच माझी धडधड कमी होण्यासाठी एक कारणही.

डावीकडच्या पलंगावर ‘तेंडुलकर’ गळ्यापर्यंत चादर ओढून डोळे मिटून पडलेले होते. कदाचित जागे असावेत. दोन-तीन मिनिटे गेली. मी तेथील एका खुर्चीवर स्थिरावलो. त्यांनी मी बसलेल्या दिशेनी मान वळवली. डोळ्यांवर चष्मा लावला. मी उठून त्यांच्यापाशी गेलो. नमस्कार करून सांगितले, की ‘ मी सतीश पाकणीकर.’ त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. मला खूण करीत खुर्ची जवळ घेण्यास सांगत हातानेच बसण्यास सांगितले. माझ्याही नकळत मी ती कृती केली व त्यांच्या बाजूला बसलो. परत पाच मिनिटे गेली. काहीच घडले नाही. नंतर त्यांनी सिस्टरला बोलावून उठून बसण्यासाठी बेडचा अँगल तिरका करून घेतला. चादर मांडीवर घसरली. आणि मला त्यांच्या गळ्यापाशी एक मोठे बँडेज लावलेले दिसले. रुग्णाला अशा स्थितीत पाहणे जरा अवघड वाटते मला. इतक्यात अजून एक व्यक्ती आली. त्यांनी तेंडुलकरांसाठी नाश्ता आणला होता. परत एकदा मला ‘बफर टाइम’ मिळाला. होता होईल तितका मी कम्फर्टेबल होण्याचा प्रयत्न करीत होतो. इतक्यात तेंडुलकर स्वतः म्हणाले, ‘अरे मी आधी नाश्ता करतो. मग बोलू.’ त्यांनी पुढ्यात नाश्त्यासाठी बेडवर ठेवण्याचे एक स्टीलचे टेबल घेतले. मला ते बरेच होते. आणि मी तरी काय बोलणार होतो? मला तर त्यांनी का बोलावलेय हेही अजून कळले नव्हते. मीही मान हलवली. त्यांनी शांतपणे नाश्ता केला. मी तोवर मंगेश तेंडुलकर यांच्याशी बोललो. पाणी व औषधे घेऊन झाल्यावर त्यांनी परत हाक मारली ‘ये रे!’ मी परत त्यांच्या समोर.

मग त्यांनी भिंतीवरच्या भीमसेनजींच्या कॅलेंडरकडे बोट दाखवत ते आणण्यास सांगितले. मी ते आणून त्यांच्या पुढ्यातील त्या छोट्या टेबलवर ठेवले. कॅलेंडरच्या पहिल्याच पानावर भीमसेनजींचा तानपुरा जुळवतानाचा फोटो आहे. त्यांनी परत पाच मिनिटे तो फोटो पाहिला. मग म्हणाले, ‘फार चांगलं काम केलंयस तू हे. अरे मला हे कॅलेंडर रामभाऊंनी दिलं. मी ते तेथे दारावरच लावलं होतं; पण त्या रात्रीच कोणी तरी ते काढून नेलं. मी रामभाऊंना परत एकदा द्यायला सांगितलं आणि तुलाही भेटायला ये असा निरोप द्यायला सांगितलं. बरं झालं आलास तू.’

मला उलगडा झाला होता, की मला का बोलावलंय. मी एकदम रिलॅक्स झालो आणि म्हणालो ‘दोन गोष्टी त्यामुळं साधल्या. एक तर कॅलेंडर कोणी तरी नेलं हे ऐकून मला बरं वाटलं. कारण काय गोष्ट न्यायला पाहिजे हे त्या व्यक्तीला कळलं. आणि दुसरं म्हणजे त्यामुळे तुमच्यापर्यंत मला पोहोचता आलं.’ आता ते एकदम मनापासून हसले. मग कॅलेंडरची एक-एक पानं उलटत त्यांची प्रत्येक पानागणिक कौतुकाची वाह वा येत गेली व त्यांच्यासारख्या मातब्बर कलाकाराला आपण केलेलं काम आवडलंय हे जाणवत माझंही मन सुखावलं. मागे एकदा भीमसेनजींच्या प्रदर्शनाच्या वेळी मी त्या तानपुरा जुळवतानाच्या फोटोचं एक पोस्टर छापून घेतलं होतं. मधुभाऊ गानू यांनी ते पोस्टर तेंडुलकरांना भेट दिल्याचं मला सांगितलं होतं. भीमसेनजी त्यांचे आवडते गायक. त्यामुळे त्यांच्या कॅलेंडरमधील विविध गानमुद्रा पाहताना ते त्यात हरवून जाणार नाहीत तर काय? 

तेंडुलकर म्हणाले, ‘काय अचाट माणूस आहे हा? संपूर्ण अंगांनी गाणं व्यक्त होतं त्याचं. हे तू चांगलं केलंस, की या त्यांच्या भाव-मुद्रा जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवल्यास; पण माझी एक तक्रार आहे की या सर्व फोटोंचं प्रिंटिंग अजून किती तरी चांगलं होऊ शकलं असतं.’ आता ते एक लेखक नव्हे तर एका फोटोग्राफरच्या नजरेतून बोलत होते. ते एक उत्कृष्ठ फोटोग्राफर आहेत हे मला आधीपासून माहीत होतेच. कारण ‘पुलं’च्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर जबाबदारी असलेल्या ‘गणगोत’ या फोटो प्रदर्शनात तेंडुलकरांनी काढलेल्या फोटोंचे कोलाज मी पॅनोरामिक फ्रेम करून लावले होते. मग बराच वेळ फोटोंच्या तांत्रिक बाबींवर बरेच बोलणे झाले. मी ४०० एएसए ते ३२०० एएसए या सर्व प्रकारच्या फिल्म वापरून ते फोटो टिपले आहेत व त्यामुळे त्यातील काही फोटोमधील ग्रेन हा त्यामुळे आलेला आहे हे त्यांना सांगितले. त्यांचे बऱ्यापैकी समाधान झाल्याचे दिसत होते.

बराच वेळ ते बसून असल्याने मी त्यांना परत पडायचे आहे का असे विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘अरे, नाही. आता मी जरा माझ्या मेल्स चेक करतो.’ मग त्यांनी कॅलेंडर बाजूला ठेवत त्या टेबलवर लॅपटॉप घेतला. मी खुर्ची जरा मागे सारून बसलो. ते लॅपटॉपमध्ये गुंगून गेले. त्यांच्या बरोबर मागे मोठी दुधी काचेची खिडकी होती. ते बसलेले. पुढ्यात त्या टेबलवर लॅपटॉप. त्यांची पांढरी दाढी. तरतरीत नाक. नाकावर चष्मा. अंगात पांढरी बंडी. मांडीवर पांढरी चादर व त्यांच्या मागून येणाऱ्या प्रकाशाने एक अप्रतिम असे ‘सिल्ह्युत’ त्या अँगलने मला दिसत होते. एकदम फोटोजेनिक. माझी चुळबूळ सुरू झाली. हा अप्रतिम क्षण मला कॅमेऱ्यात पकडण्याची संधी अनायासे चालून आली होती. सुदैवाने मी कॅमेरा नेला होता. मी त्यांना विचारायचे धाडस करण्याचे ठरवले. आणि त्यांच्या जवळ जाऊन तसे लगेचच विचारलेही. त्यावर माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, ‘अरे हे पाहा... माझ्या गळ्याशी बँडेज लावलंय. तुझ्या फोटोत ते कायम तसेच राहील. ती आठवण नकोशी वाटेल. त्यापेक्षा असे करू. काहीच दिवसांत बरा होऊन मी येथून घरी जाईन. तुला फोन करून बोलावीन. तेव्हा काढ पाहिजे तेवढे फोटो.’ एका क्षणात किती विचार केला होता त्यांनी. यावर मी काय बोलणार? अशा अवस्थेत असूनही व्यक्त झालेला त्यांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन जाणून व पुढचे निमंत्रण मिळाल्याने मन आनंदून गेले. त्यांचा व मंगेशजींचा निरोप घेऊन मी निघालो.

काहीच दिवसांत विजय तेंडुलकर हे जग सोडून अनंताच्या प्रवासाचा अभ्यास करण्यास निघून गेले. गेली दहा वर्षे माझ्या मनाच्या कप्प्यात खोलवर असलेली त्यांची ती ‘सिल्ह्युत’ इमेज कधी तरी वर उफाळून येते. परत एकदा मी तो क्षण जगतो. ते मला आश्वासन देतात; पण आता मला तो फोटोसेशन कधीच करता येणार नसतो. कुठल्याशा कार्यक्रमात त्यांच्या टिपलेल्या भावमुद्रांवरच मला आता समाधान मानायला हवे असे मनाला समजवायचे असते. मन मानण्यास तयार नसते तरीही बळेच मी त्या तयारीला लागतो.

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UWPJCR
Similar Posts
‘लावण्यवती’ चित्रपटसृष्टीच्या चंदेरी चमचमीचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या व तारे-तारकांच्या चकचकीत प्रतिमांची रेलचेल असलेल्या अनेक मासिकांमधून मी या अभिनेत्रीचे असंख्य फोटो पाहिले होते. त्या सर्व प्रकाशचित्रांत तिने केलेला मेक-अप वेगवेगळा असला तरी त्याचं साह्य पुरेपूर होतं; पण आत्ता समोर चेहऱ्यावर कणभरही मेक-अप नसलेली माधुरी उभी होती
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
शहंशाह-ए-गज़ल गज़लसम्राट मेहदी हसन यांचा १८ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘संतूर-नायक’ माझं मन तेहतीस वर्षं मागं गेलं. सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. मी अन् माझा कॅमेरा दोघेही ग्रीनरूममध्ये पोहोचलेलो. काहीच वेळात मी ज्यांना बघण्यासाठी तेथे आलो होतो ते पंडित शिवकुमार शर्मा तेथे पोहोचले. सहा फुटांच्या आसपास उंची. त्यांच्या काश्मिरी गोरेपणाला शोभून दिसणारा गर्द निळा झब्बा व पायजमा, लक्षात येतील इतके कुरळे केस आणि तलवार कट मिशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language